दोघांच्या हालचाली गुप्त ; सभापतीपदासाठी दिलीप कोळींचे नाव ?
ठाकरे गटाची सत्ता उलथून महायुतीचा झेंडा फडकणार
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेच्या पटलावर भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास ठराव आणला आहे. हे महायुतीचे १३ संचालक सहलीवर रवाना झाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच २ जणांच्या हालचाली महायुतीकडून गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. सन २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत ११ जागा जिंकत महाविकास आघाडीने बाजार समितीत सत्ता मिळवली होती.आता गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्याचा परिणाम बाजार समितीच्याही राजकारणावर होताना दिसून येत आहे.(केसीएन)काही दिवसांपुर्वीच बाजार समितीचे उपसभापती पांडूरंग पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठी १२ ऑगस्ट रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
मात्र, त्याआधीच सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव आणल्यामुळे बाजार समितीचे राजकारणच बदलले आहे. २०२३ मध्ये महाविकास आघाडीने १८ पैकी ११ जागा जिंकत बाजार समितीत एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात आल्यामुळे काही संचालक देखील अजित पवार गटात आले आहेत. तसेच मनोज चौधरी यांनीही काही दिवसांपुर्वी भाजमध्ये प्रवेश केला. तर सुनील महाजन हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे बाजार समितीत महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे.(केसीएन)या पार्श्वभूमीवर दिलीप कोळी, सुनील महाजन, मनोज चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, जयराज चव्हाण, योगराज सपकाळे, अरुण पाटील, पांडुरंग पाटील, हेमलता नारखेडे, पल्लवी देशमुख, समाधान धनगर, प्रभाकर सोनवणे या १३ संचालकांनी बंड केले असून ते सहलीवर रवाना झाले आहे. तसेच, आणखी दोघे जण सहलीवर जाणार असून त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहे. तर व्यापारी गटातील अशोक राठी हे तटस्थ असून या १३ संचालकांविरोधात आता श्यामकांत सोनवणे यांच्यासह एक महिला संचालक हे दोघेच उरलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.