जळगाव (प्रतिनिधी) : राज्यशासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सोमवार दिनांक ८ जुलैपासून मनपाच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडणार असून या अतिरिक्त कामाचा बोजाही त्यांना पेलावा लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची सर्वत्र गर्दी होत आहे. यामुळे शासनाने ‘नारी शक्ती दूत’ नावाचे ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून घर बसल्यादेखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना आयडीसीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडूनदेखील महिलांचे अर्ज भरून द्यावेत असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
त्यामुळे महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोफत भरून दिले जाणार आहेत. भरलेल्या पात्र अर्जानुसार अंगणवाडी सेविकांना शासनाकडून प्रती अर्ज ५० रुपये प्रमाणे पैसे देण्यात येणार आहेत. यासाठी प्रभाग समितीच्या कार्यालयात स्कॅनर ठेवण्यात येणार आहे. यासोबतच प्रभाग समितीच्या कार्यालयावर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याबाबतचा फलकही लावण्यात येणार असल्याचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले.