जळगाव : ज्या तरुणांच्या पिढीवर अवलंबून राहून आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहोत, त्या तरुणांची प्रतिनिधी मानसी बागडे हिला जर आत्महत्या करावी लागत असेल तर महासत्तेची स्वप्न बघण्याचा आपल्याला अधिकार आहे काय ? तरुणांच्या आशा, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जातपंचायत आडवी येणार नाही हा आशावाद तरुणांच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगांव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे रविवारी १ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे यांच्यासह जातपंचायतीला मूठमाती अभियान विभागाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, बानोताई बागडे, राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा महिला असोसिएशन अध्यक्षा राजकुमारी बालदी उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ.नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन करणारे गीत कार्यकर्त्यांनी सादर केले. शहरात २३ जानेवारी रोजी कंजरभाट समाजातील मानसी बागडे या तरुणीने जातपंचायतीच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या परिषदेचे उद्घाटन मानसीची आई बानोताई यांच्या हस्ते जातपंचायतीच्या बेड्या तोडून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. कौमार्य चाचणी, बालविवाह, शोषक जातपंचायत अशांच्या बंधनातून तरुणीला मुक्त करून हे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात कृष्णा चांदगुडे यांनी, राज्यात जातपंचायतींचे अस्तित्व दिसून आल्यानंतर त्यांच्या शोषक बाबींविरुद्ध अंनिसने आवाज उठविला असे सांगत परिषद घेण्यामागील भूमिका विशद केली.
आ.राजूमामा भोळे म्हणाले की, भारतीय संविधानानुसार आम्ही काम करतो. संविधानाचे पालन सर्वांनी केले पाहिजे. जीवनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. संत, समाजसुधारकांनी केलेले विचारपरिवर्तनाचे काम पुढे गेले पाहिजे. आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था चांगली निर्माण झाली पाहिजे. मी अंधश्रद्धा मानत नाही, माझा अंनिसच्या कामाला पाठींबा आहे. प्रत्येक समाजात चुकीच्या रूढी, प्रथा असतील तर दूर झाल्या पाहिजेत, असेही आ. राजूमामा भोळे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील यांनी, जातपंचायतींच्या जाचांना सामाजिक पातळीवर सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. याविषयी शासन प्रचंड उदासीन आहे. जातपंचायतींनी पिडीत व्यक्तींना आधार देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे महत्वाचे आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण नसल्यानेच जातपंचायती फोफावल्या आहेत, असे सांगितले. महाराष्ट्राचे समाजमन हे जातपंचायतीच्या विरोधात आहे. जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून कुठलाही तरुण, कुठलेही कुटुंब जर बाधित असेल अशा लोकांच्या पाठीशी अंनिस कायम उभी आहे, असेही अविनाश पाटील म्हणाले. सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी मानले. आभार भारती पाथरकर यांनी केले.
प्रथम सत्र
परिषदेच्या पहिल्या सत्रात जातपंचायत पिडीत व्यक्तींनी अनुभव कथन केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील शासकीय वितीय सल्लागार कृष्णा इंद्रेकर होते. सत्रात नाशिक येथील कोमल वर्दे,अरुणा कुंभारकर, अण्णा हिंगमिरे, तनुजा मोती, मुंबई येथील लीला इंद्रेकर, औरंगाबाद येथील दर्शनसिंग मलके हे सहभागी झाले होते. जातपंचायतींनी कसा त्रास दिला, वाळीत टाकल्यावर अनुभव आले अशा प्रकारे पिडीतांनी आपबिती कथन केली. यात कोमल वर्दे यांनी पती वारल्यावर पत्नीला अंधार खोलीत कोंडण्याच्या प्रथेला विरोध केला असे सांगितले तर तनुजा मोती यांनी कंजरभाट समाजातील जाचक रूढी प्रथा यांना विरोध केला पाहिजे असे सांगितले.
अरुणा कुंभारकर यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून पित्याने गळा घोटला होता त्यामुळे हळव्या झाल्या होत्या. परिषदेत त्यांना रडू कोसळले. त्यांच्यावतीने कृष्णा चांदगुडे यांनी माहिती दिली. अण्णा हिंगमिरे यांनी भटक्या जोशी समाजाने बहिष्कृत केल्याची आपबिती सांगितली तर लीला इंद्रीकर यांनी कंजरभाट समाजातील तरुणांच्या पाठीशी पालकांनी खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले. दर्शनसिंग भालके म्हणाले, कंजरभाट समाजाने मला सहा वर्षे समाजाबाहेर काढल्याचे म्हटले. कंजरभाट जातपंचायतीचे प्रतिनिधी हसन मलके यांनीही त्यांचे अनुभव सांगितले.
सत्र अध्यक्ष कृष्णा इंद्रेकर म्हणाले की, आणखी किती मानसिंच्या आत्महत्या होणे आपल्याला अपेक्षित आहे ? आपण २१ व्या शतकात आज जातपंचायतींना मूठमाती दिलीच पाहिजे. विशीतील तरुणांचा वेश्या व्यवसाय सुरु झाला आहे. कंजरभाट समाजात अमानुषपणे जातपंचायतीनचा कारभार सुरु आहे. संविधान प्रचलित कायदेव्यवस्था झुगारून कंजरभाट समाजात बेभानपणे अत्याचार सुरु आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून प्रबोधन केले पाहिजे. कंजरभाट समाजातील जात पंचांनी आता समाजाचे शोषण करणे थांबवले पाहिजे. कंजरभाट समाजात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आहेत मात्र तरीही कौमार्य चाचणी सुरु आहे, हे कधी थांबेल ? असाही सवाल इंद्रेकर यांनी विचारला. सूत्रसंचालन सुनील वाघमोडे यांनी तर आभार प्रा.डी.एस.कट्यारे यांनी मानले.