शिताफीने पळून जाताना केली अटक

पहुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; गावठी कट्टा जप्त
पहुर / जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहातून रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून २५ जुलै रोजी फरार झालेल्या तीन कैद्यांपैकी मुख्य सूत्रधार व बडतर्फ पोलीस अधिकारी सुशील मगरे या फरार कैद्याला जामनेर तालुक्यातील पहूर येथे पोलिसांनी पळून जात असताना शिताफीने पहाटे ५.३० वाजता अटक केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या सुशील अशोक मगरे या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याने कारागृहातील कैदी गौरव विजय पाटील आणि सागर संजय पाटील यांच्यासह २५ जुलै रोजी रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून जगदीश पाटील याच्या मदतीने फरार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिन्याभरानंतर गौरव पाटील, सागर पाटील तसेच जगदीश पाटील यांनादेखील अटक केली होती. त्याचबरोबर त्यांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या इतर पाच ते सहा जणांना देखील अटक केली आहे. या प्रकरणी हे सर्व जण कारागृहात आहेत. यातील मुख्य सूत्रधार असलेला आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे रा. पहूर ता.जामनेर पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विविध पथक त्याच्या मागावर होते. मुंबई, पुणे, गुजरात आदी ठिकाणी पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.
रविवारी २९ नोव्हेंबर रोजी पहूर पोलिस स्टेशनला प्रथमच पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले राहुल खताळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सुशील मगरे याच्या लेले नगर भागातील घरी पोलिसांनी पहाटे ५.३० वाजता धाड टाकली. तेथे सुशील मगरला कुणकुण लागताच तो फरार होण्यासाठी बाहेर आला. त्याने २५ फूट जिन्यावरून खाली उडी मारली आणि पलायनाच्या बेतात असताना पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे यांनी त्याला शिताफीने पकडले. त्याच्या खिशामध्ये गावठी कट्टा सापडला असून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिस स्टेशनला आणण्यात आले. या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना देण्यात आली असून त्यांनी पहूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. कारवाई पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवरे ,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख,अनिल राठोड, ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केली असून त्यांचे कौतुक होत आहे.
सुशील मगरे याची पार्श्वभूमी
आरोपी कैदी सुशील मगरे हा १२ सप्टेंबर २०१७ रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद पोलीस दुरक्षेत्रात ड्यूटीवर असतांना गुन्हेगारीची टोळी तयार करून नेरी-औरंगाबाद रस्त्यावरील माळपिंप्रीजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लूट केली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित म्हणून सुशील मगरे याला १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यात रिव्हाल्वरचा धाक दाखवून पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्समधून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना 24 नोव्हेंबर रोजी भरदिवसा घडली होती. यावेळी एकाने गोळीबारही केला होता.







