जिल्ह्यातील शहरी भागात 263 पथकांमार्फत करण्यात आली दोन लाख 68 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती
जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत गेल्या पाच दिवसांत जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील दोन लाख 68 हजार 405 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबर, 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेस जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी, ता. जळगाव येथून सुरवात करण्यात आली आहे. नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील शहरी भागात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने 263 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देणार आहेत. हे पथक घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करणार असून तेथे कोविड 19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यात 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होईल. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसवाळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर व शेंदूर्णी या 18 नगरपालिका/नगरपंचायतीमधील 263 आरोग्य पथकांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहितेतंर्गत आतापर्यंत 63 हजार 2 घरांना भेट देवून दोन लाख 68 हजार 405 नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. या करण्यात आलेल्या तपासणीत 50 वर्षे वयावरील व्यक्तींची संख्या 63 हजार 38 इतकी असून यामध्ये 32 हजार 35 पुरुषांचा तर 31 हजार 43 स्त्रीयांचा समावेश आहे. या तपासणीत 9 हजार 580 कोमार्बिड रुग्ण, सर्दी, ताप, खोकला (ILI) चे 381 तर सारीचे 88 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 386 संशयितांचे आरटीपीआरद्वारे स्वॅब घेण्यात आले आहे तर 230 संशयितांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असल्याचे नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांनी सांगितले.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी. सध्या असलेल्या आजारांवरील उपचार सुरू ठेवावे, त्यात खंड पडू देवू नये, ताप आल्यास अथवा थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.