
जामनेर तालुक्यात खळबळ



जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर ते जामनेर मार्गावरील सोनाळा रस्त्यावर शिंगाईतच्या व्यक्तीची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी मद्यपान करून प्रमोद वाघ यांची हत्या करून घटनास्थळावरून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सोनाळा -पहूर शिव रस्त्यावर पहूर -जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावननजीक सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ (वय ३७) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रमोद वाघ सकाळपासूनच घरून निघाला होता. दुपारी जामनेरहून पहूर येथे जातो, असे शालकास फोनवरून सांगितले. शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी पाचच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह ३ ग्लास, पाणी बॉटल आणि अर्धवट खाल्लेला वडापाव आढळून आला. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मारेकऱ्यांनी निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने झाडाखाली दगड आणि माती रक्ताने माखली होती. प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले. शेतकऱ्याने तत्काळ पहूर पोलिसांची संपर्क केला.
पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.चाळीसगाव येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. जळगाव येथील न्यायवैद्यक पथकाचे वाघ यांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड व माती ताब्यात घेतली असून, मयताजवळील मोबाईल फोन मारेकऱ्यांनी लांबविल्याचे समजते. पहूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारेकरी झाले कैद असतील, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत प्रमोद वाघ याच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
