जळगाव ( प्रतिनिधी ) – शहर पोलीस ठाण्यासमोर पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांच्याच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यावर या गुन्ह्यात दोन संशयितांना अटक करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्यात पो ना किशोर निंकुभ ( रा. कांचननगर) कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री निकुंभ पाहुण्यांना सोडण्यासाठी बसस्थानकावर गेले होते. तेथून परत आल्यानंतर गस्तीवर असतांना रात्री पावणे अकराच्या सुमारास टॉवर चौकातील महावीर आईसक्रीमजवळ गर्दी दिसल्याने निकुंभ यांनी संबधितांना हटकले. रात्री कुठे फिरताय घरी जा असे सांगितले. याचा राग आल्याने आशुतोष ढंढोरे, राजवीर ढंढोरे यांनी निकुंभ यांच्या दुचाकीला लावलेली पोलीस काठी काढून निकुंभ यांना मारहाण केली. राजवीर याने पकडून ठेवले तर आशुतोष ढंढोरे यांने निंकुभ यांना कंबरेवर, डोळ्यावर मारहाण केली. पोलीस ठाण्याजवळीलच घटना असल्याने पोलीस ठाण्यातील इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले. व सोडवासोडव केली.
संशयितांना पोलीस ठाण्यात घेवून येत असतांनाही संशयितांनी निकुंभ यांना मारहाण केली. रात्री उशीरा पोलीस नाईक किशोर निंकुभ यांच्या फिर्यादीवरुन आशुतोष ढंढोरे, राजवीर ढंढोरे, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, संदीप ढंढोरे, विलास लोट, नितीन जावळे व इतर अशा ९ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयितांपैकी संदीप ढंढोरे (वय ४२) व विलास लोट (वय ४५) (दोन्ही रा. ब्राम्हणवाडी बळीरामपेठ ) या दोघांना अटक केली.