जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये वाजतोय गुलाबराव देवकरांचा डंका !
राष्ट्रवादीचे गुलाबराव, ‘फ्लॉवर’ नही फायर है ! ; कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला
जळगाव (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी साधारण अडीच वर्षांचा कालावधी असला तरी या बहुचर्चित मतदार संघाचे आलटून पालटून नेतृत्व करणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्येच पुन्हा ‘काट्याची टक्कर’ होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. ग्रामीण मतदारसंघात देवकरांच्या समर्थकांचे कार्य वाढत असून तिसरी टक्कर तिसरे गुलाबराव म्हणजेच गुलाबराव वाघ हे देतील असे दिसून येत आहे.
सध्या महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार असलेले उमेदवार गुलाबराव देवकर यांचे देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विविध भागात सुरु असलेल्याला मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आणि इतर समाजसेवी उपक्रमांमधून संपर्क कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघ कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तर नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा . पण आता शिवसेना आणि शिंदेगट असे विभाजन झालेले असल्याने सामान्य शिवसैनिकांप्रमाणे सर्वसामान्य मतदार संभ्रमात सापडला आहे.
शिंदे गटातील ४० आमदार शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत गेल्याने पक्षीय बलानुसार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून आता त्यांची सत्ता आली आहे. तर दुसरीकडे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे नेतृत्व करणारे गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना ठाकरे सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री पद कायम ठेवण्यात आले. तर दुसरीकडे धरणगाव तालुका, जळगाव ग्रामीण विभागातून गुलाबराव पाटलांना आणखी तिसरे गुलाबराव अर्थात शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ता किंवा उद्धव ठाकरे यांना मानणारे कार्यकर्ते आणि मतदार आणि गुलाबराव पाटील यांच्यासह एकनाथ शिंदे गटाला माननाऱ्या मतदार ,कार्यकर्त्यात फूट पडण्याची शक्यता आहे.
याचा फायदा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार गुलाबराव देवकर यांची आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याची शक्यता मानली जात आहेत . एकीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे सरकार आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघांमध्ये विविध विकासकामांचा धडाका लावून कोट्यवधींची कामे केली असून काही कामे मार्गी लावली जात आहे. तर दुसरीकडे गुलाबराव देवकरही आगामी होणाऱ्या विधान सभेच्या निवडणूकीसाठी त्यांनीही आपला जनसंपर्क कायम ठेवला असून मतदार संघातील नागरिकांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडविण्याचे कामही ते करीत आहे .