नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- येत्या काही दिवसांत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही. घरीच राहून फक्त एक गोळी कोरोनापासून मुक्ती देईल. कोविडप्रतिबंधक लस बनवणाऱया फायझर कंपनीने ही औषधी गोळी बनवली आहे. सध्या तिच्या चाचण्या सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्या तर कोरोनाबाधित रुग्णांवर घरच्या घरीच उपचार शक्य होणार आहेत.
फायझर कंपनीने या गोळीला ‘पीएफ-07321332’ हे नाव दिले आहे. अमेरिका आणि बेल्जियममध्ये या गोळीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. 18 ते 60 वयोगटातील 60 निरोगी व्यक्तींवर या चाचण्या केल्या जात आहेत. यापूर्वी प्राण्यांवर केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. गोळीचे कोणतेही दुष्परिणाम प्राण्यांमध्ये दिसून आले नाहीत.
‘सार्स-कोविड-2’ या विषाणूशिवाय कोरोनाच्या इतर प्रकारच्या विषाणूंवरही ही गोळी प्रभावी दिसून आली आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाच्या विषाणूने नवनवीन रूपे बदलली तरी त्यावर ही गोळी रामबाण ठरेल असा दावाही फायझर कंपनीने केला आहे. संसर्गाचे प्राथमिक लक्षण दिसताच औषध म्हणून देता यावे यासाठीच ही गोळी बनवण्यात आली आहे. ती दिल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात किंवा आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज शक्यतो पडणार नाही, असे फायझर कंपनीचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी मायकेल डॉलस्टन यांनी म्हटले आहे.
मानवी शरीर या गोळीचा प्रभाव कितपत झेलू शकेल याचा अंदाज घेण्यासाठीच पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये ठरावीक व्यक्तींचाच समावेश केला गेला आहे. पहिला टप्पा यशस्वी झाला तर दुसऱया आणि तिसऱया टप्प्यात मोठय़ा प्रमाणात स्वयंसेवकांचा समावेश केला जाईल, असे कंपनीचे अध्यक्ष व सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी म्हटले आहे.
तोंडावाटे घेण्यात येणाऱया गोळीशिवाय इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱया डोसच्याही चाचण्या फायझर कंपनी करत आहे. त्या इंजेक्शनला ‘पीएफ-07304814’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या या इंजेक्शनचा पहिला टप्पा सुरू आहे. सध्या हे इंजेक्शन रुग्णालयात दाखल कोरोनाग्रस्त रुग्णांना दिले जात आहे.
‘पीएफ-07321332’ ही गोळी एचआयव्ही प्रतिबंधक गोळ्यांसारखीच आहे. या गोळीने शरीरातील विषाणूंचे प्रमाण वेगाने कमी करता येईल. या गोळीमुळे विषाणूंना रुग्णाच्या शरीरात वाढताच येत नाही आणि रोगाची लक्षणेही दूर होऊन रुग्ण बरा होतो. या गोळीमध्ये वापरण्यात आलेल्या औषधांमुळे विषाणूला रुग्णाच्या शरीरातील पेशींमध्ये विस्तार करणे अशक्य होते.