निराधार महिलेचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक
जळगाव;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात असणार्या रेणुका नगरात आज सकाळी लागलेल्या आगीमध्ये लाकडी फळ्यांनी बांधलेल्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाल्याची घटना आज सकाळी येथे घडली असून या आगीत निराधार महिलेचे कुटुंब उघड्यावर आले आहे . तिच्या कुटुंबियांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेणुका नगरात वास्तव्यास असलेले भीकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्या पार्टीशनच्या घराला आज सकाळी अकस्मात आग लागली.या आगीमध्ये लाकडी फळ्या जळून यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
या घरात रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह अलीकडेच राहण्यासाठी आले होते. या महिलेचे पती वारले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. आज त्या गाडेगाव येथे काम करण्यासाठी गेली होती. मात्र शेजारच्यांनी फोन करून तिला तिच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर ही महिला तातडीने घरी आली. आपले घर जळून खाक झाल्याची दिसताच त्या महिलेला चक्कर आली.
आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी महिलेला मदत मिळावी यासाठी अनेकांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.