वरणगाव येथे घडली होती घटना
जळगाव(प्रतिनिधी) – : सोशल मीडियावर बनावट (फेक) प्रोफाईल तयार करून एका युवकाला सुनसान जागी बोलावून त्याच्यावर लोखंडी रॉड आणि देशी कट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेला २४ वर्षीय सरफराज सैयद साकिर सैयद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबाचा मुख्य कमाऊ व्यक्ती होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भुसावळ तालुक्यातील दोघा आरोपींना यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत.
१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगरच्या काजीपुरा येथील सरफराज सैयद याला इन्स्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने बनवलेल्या बनावट आयडीवरून सतत मेसेज आणि कॉल आले. गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याला वरणगाव येथील फुलगांव उड्डाणपुलाखालील (फ्ललाईओव्हर) सर्व्हिस रोडवर बोलावण्यात आले.
सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, तिथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या दोन युवकांनी दुचाकीवरून येऊन त्याच्यावर अचानक लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्लेखोरांनी सरफराजच्या डोक्यावर आणि पायावर लोखंडी रॉडने सपासप वार केले, ज्यामुळे तो खाली कोसळला. हल्ला सुरू असताना एका आरोपीने आपल्या कमरेतून देशी कट्टा काढून सरफराजवर दोन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी सरफराजला तात्काळ जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे काही दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भूषण उर्फ बिस्ला राजू सावले (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७) या दोघांना अटक केली आहे.








