जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल पाचोरा येथे तालुकास्तरीय स्काऊट गाईड संघनायक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे, पाचोराच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, भातखंडे केंद्राचे केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार, नगरदेवळा केंद्राचे केंद्रप्रमुख मोराणकर, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर.ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास जी.यु. पवार,नगरदेवळा व सोनवणे, गिरड हायस्कूल हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे,उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील व पर्यवेक्षिक ए.आर.गोहिल यांच्या हस्ते वरील सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला.
स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणातून शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांनी विद्यार्थी व शालेय जीवनात स्काऊट-गाईडचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. या शिबिरात स्काऊट गाईडची प्रार्थना, झेंडा गीत, ध्वजारोहण पद्धत, गाठीचे प्रकार, स्काऊट गाईडच्या टाळ्यांचे विविध प्रकार, स्काऊट गाईडचे खेळ, बी.पी. व्यायाम, शेटीच्या खुणा, स्काऊट गाईडचे कर्तव्य,वचन, नियम यासारखे विविध उपक्रम वाजेपर्यंत राबवण्यात आले. गो.से. हायस्कूलचे स्काऊट गाईड प्रमुख आर.बी कोळी, गाईड कॅप्टन एम. आर. सोमवंशी, एस.पी. सूर्यवंशी व तालुकाभरातून विविध शाळांचे स्काऊट गाईड प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्तर एम.आर. पाटील यांनी केले.