
सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकडवर चोरट्यांचा डल्ला; अमळनेर पोलिसांत गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील रामेश्वर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी रात्री ९ ते १८ जून रोजी सकाळी ५ या कालावधीत ही घरफोडी झाली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ हजार रुपये किमतीची चांदीची चैन, २० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच ८ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी कस्तुराबाई साहेबराव वंजारी (वय ६५, रा. रामेश्वर, ता. अमळनेर) यांनी १५ जुलै रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत.










