अमळनेर शहरातील गुरुकृपा कॉलनी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- घर खाली करून घेण्याच्या कारणावरून गुरुकृपा कॉलनीत एका कुटुंबातील तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल चिंधा पवार (वय ४८, रा. गुरुकृपा कॉलनी अमळनेर) हे परिवारासह भाडेतत्त्वावर राहत आहे. गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घरमालक पूनमचंद मंजी चव्हाण यांनी अनिल पवार यांना घर खाली करण्याबाबत सांगितले. त्यावर अनिल पवार यांनी, “मी दिलेले उसनवारीने १ लाख २० हजार रुपये परत द्या, मग मी घर खाली करतो” असे सांगितले. याचा राग आल्याने पूनमचंद मंजी चव्हाण, राजेंद्र पूनमचंद चव्हाण, श्रीकांत पुनमचंद चव्हाण आणि मीना राजेंद्र चव्हाण (सर्व रा. गुरुकृपा कॉलनी, जळगाव) या चौघांनी अनिल पवार यांच्यासह त्यांची पत्नी व त्यांची मुलगी यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी अनिल पवार यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर हे करीत आहे.