जळगाव शहरातील साहित्या नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मुंबई येथे मुलीकडे गेलेल्या महिलेच्या बंद घरातून चोरट्यांनी ७४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही चोरी ३० ऑगस्ट ते २५ सप्टेंबर दरम्यान झाली. या प्रकरणी २६ सप्टेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा ईश्वर सोनवणे (४०, रा. खुबचंद साहित्या नगर, आव्हाणे शिवार, ता. जळगाव) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. आव्हाणे शिवारात राहणाऱ्या उषा सोनवणे या मुलासह ३० ऑगस्ट रोजी विरार (मुंबई) येथे मुलीकडे गेल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातून एक तोळ्याचे सोन्याचे टोंगल, एक तोळ्याची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील साखळ्या, ११ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे रिंग असे एकूण ७४ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्या वेळी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत.