पारोळा (प्रतिनिधि) – जगात चालु असलेला कोरोना व्हायरस कोविड एकोणाविस या संसर्गजन्य आजाराने देशासह महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले आहे. त्यामुळे राज्यात वाबिस मार्च दोन हजार विस पासुन ते एकतीस मे दोन हजार विस पर्यत महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन घोषित केलेले आहे. त्यामुळे गठई काम करणाऱ्या कारागिरांची कामे बंद झालेली आहेत त्याचा फटका आर्थिक दुर्बल घटक समजल्या जाणाऱ्या चर्मकार समाजातील गठई कामगार म्हणजे बुट ,चप्पल बनविणारे तसेच दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना बसला आहे. त्यांना काम नसल्यामुळे त्यांच्याकडे उदरनिर्वाह भागविण्यासाठी पैसा नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात जीवाचे हाल होत आहेत . हातावर पोट असलेल्या गठई कामगारांवर व त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे .त्यासाठी शासनाच्या वतीने गठई कारागिरांना आर्थिक मदत देण्यात यावी, जेणेकरून त्या मदतीने गठई कामधंदा चालु होईल आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्याससुद्धा मदत होईल तसेच ज्या ज्या जिल्ह्यात दुकाने बंद आहेत त्या त्या जिल्ह्यात दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी आणि राज्य सरकारकडून चर्मकार समाजातील गठई काम करणाऱ्या कारागिरांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सो. यांच्याकडे संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना संस्थापक तथा अध्यक्ष दत्ताभाऊ कदम पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळे , खान्देश प्रमुख रविंद्र काकडे , जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे , जळगाव शहराध्यक्ष दिपक बाविस्कर , धरणगाव तालुका अध्यक्ष गणेश तायडे आदि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.