घाटकोपर (वृत्तसंस्था) – हिंगणघाट येथे भररस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून तरुणीला जाळण्यात आले होते. यामध्ये पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली होती. याचाच राग मनात असलेल्या महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. तसेच नागरिकांमध्ये प्रचंड चीड पाहायला मिळाली. त्यातच आता होळीची तयारी सर्वत्र सुरू आहे. घाटकोपर येथील मंडळाने हिंगणघाट येथील आरोपीची प्रतिकृती होळीच्या रुपात बनवली आहे. होळीच्या दिवशीच्या त्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. घाटकोपरच्या भटवाडी येथील जनता सेवा संघ संचालित भाटेश्वर महादेव मंदिर येथे होळी मध्ये हिंगणघाट आरोपींची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण विचारे यांच्या संकल्पनेतून ही होळी बनवण्यात आली आहे. हिंगणघाट येथील आरोपीला अजूनही फाशीची शिक्षा दिली गेली नाही. आम्ही याचा निषेध म्हणून आरोपीचा पुतळा जाळून निषेध करणार आहोत. स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या व तीच अस्तित्व मिटवू पाहणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण विचारे यांनी सांगितले.