मुक्ताईनगर बसस्थानकावर ७० हजारांचा ऐवज चोरी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- शहरातील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.


फिर्यादी अनिल माणिकराव पाटील (वय ५१, रा. रेणुका नगर, मुक्ताईनगर) यांच्या आई सिंधूबाई पाटील या ४ फेब्रुवारी रोजी उपचारासाठी जळगावला जाण्याकरिता मुक्ताईनगर बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सिंधूबाई यांच्या डाव्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने कापून लंपास केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर अनिल पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहेत. या घटनेमुळे बसस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून चोरट्याचा शोध घेत आहेत.








