जळगाव (प्रतिनिधी) : – तालुक्यातील कांताई बंधाऱ्याजवळ असणाऱ्या गिरणा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. या ठिकाणी समता नगर येथील १८ वर्षीय तरुण पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.दरम्यान आज जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये जामनेर तालुक्यातिल युवकाचा विसर्जनावेळी मृत्यू तर चाळीसगाव तालुक्यात पिता पुत्राचा वीज अंगावर पडून झालेला मृत्यू आणि समता नगरातील तरुणाचा विसर्ज करीत असताना झालेला मृत्यू अशा विविध घटनांनी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होऊन शोककळा पसरली आहे.
गिरणा नदी पात्रात एका मंडळाचे कार्यकर्ते गणेश विसर्जनासाठी गेले होते. या ठिकाणी गणेश विसर्जन करीत असताना भगवान नामदेव राठोड (वय १८, रा. वंजारी टेकडी, समता नगर) हा तरुण बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी आणले. तेथे त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. भगवान राठोड याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.