मालवाहू पिकअपच्या धडकेत पानटपरीचा चक्काचूर झाल्याने नैराश्य ?
शिरसोली ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळील लक्ष्मी पानटपरीला एका मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिल्याने पानटपरी जमीनदोस्त झाल्याच्या नैराश्यात पानटपरी मालक पुनमचंद श्रावण बारी(वय ४०) या तरुणाने आज सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
१४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता भरधाव वेगाने येणारी एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाची मालवाहू पिकअप लक्ष्मी पानटपरीला धडकली होती. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद श्रावण बारी तणावात होते. पानटपरीची नुकसान भरपाई देतो असे मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले होते. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालक नुकसान भरपाई देत नाही असे सांगितल्या नंतर पुनमचंद बारी यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचे पानटपरी हेच एकमेव साधन होते. शेवटी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. २० वर्षांपासून ज्या पानटपरीवर पुनमचंद बारी यांचा उदरनिर्वाह होता. ती पानटपरी आता जमीनदोस्त झाली व आपल्यावर असलेले कर्ज कसे चुकवावे या चिन्तेने बारी यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातच बारी यांनी आज सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण, आई – वडील असा परिवार आहे.