यावल तालुक्यातील मनवेल येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील दगडी मनवेल येथील एका ४० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. २ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश विक्रम कोळी (वय ४०, रा. दगडी मनवेल ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात तो परिवारासह राहत होता. सोमवारी दि. १ जुलै रोजी रात्री जेवण करुन स्वतःच्या घरी झोपला होता. मंगळवारी सकाळी त्याला कुटुंबीयांनी घरातील काम करण्यासाठी उठविण्याकरीता गेले असता राहत्या घरात त्याने छताच्या आसारीला दोरीने बांधून गळफास घेतल्याचे उघड झाले. त्याला तातडीने एका वाहनात टाकून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले.
यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील जीवन जयसिंग कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.