चोपडा तालुक्यात गलंगी गावाजवळ घटना
चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील गलंगी गावाजवळ एका अज्ञात ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ५७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गलंगी गावाजवळ घडली असून, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पृथ्वीराज मुकुंदा केदार (वय ५७, रा. चौगाव, ता. चोपडा) हे गलंगी गावाजवळून जात असताना एका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पृथ्वीराज केदार हे गंभीररित्या जखमी झाले होते.
अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, औषधोपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत मोहन कोळी करत आहेत. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात ट्रकचा शोध पोलीस घेत आहेत.









