जळगावातील तळेले कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चोरटयांनी उच्छाद मांडला आहे. सैन्य दलात जवान असलेल्या तरुणाच्या घरात चोरटयांनी बाहेरगावी गेल्याची संधी साधून घर फोडून २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तळेले कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी दि. ५ जून रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निखील महाजन यांचे कुटूंब तळेले कॉलनीत वास्तव्याला आहे. महाजन कुटूंब दि. ४ जुलै रोजी सकाळी मुंबईला गेले होते. त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात व पेटीत ठेवलेली १ लाख १० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत, ६० हजार रुपये रोख आदी दागिने व पैसे मिळून २ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार दि. ५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. ही घटना समजताच महाजन कुटूंबाने जळगाव गाठले. शनीपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.