भुसावळ येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग केल्यास अधिक परतावा मिळेल, असे सांगून भुसावळ शहरातील तरुणीची तब्बल ३ लाख २ हजार ४९८ रुपयात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रृती रत्नाकर नंदेश्वर (वय २८, पांडुरंग टॉकीजजवळ, भुसावळ) या तरुणीने फिर्याद दिली होती. दिनांक १८ ते २२ मे दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एका व्हॉट्स अप ग्रुपला ८४८५०३७३९४ व ८८८६१४०१९३ या क्रमांकावरून जॉईन करण्यात आले व तुम्हाला टेलिग्रामवर जॉईन केले असत्याचे सांगून कॉईन्सविचची लिंक पाठवून त्यात तक्रारदाराला खाते उघडण्यास सांगण्यात आले.
सुरुवातीला नंदेश्वर यांच्या खात्यावर भामट्यांनी १८०, ५५०, ६००० रुपये जमा करून त्यांचा विश्वास मिळवला. त्यानंतर पाचशे, दोन हजार, वीस हजार प्रमाणे एकूण ३ लाख २ हजार ४९८ रुपये विश्वासाने भरण्यास सांगून ते परत न करता फसवणूक करण्यात आली. पैसे परत मिळत नसल्याने व फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट होताच नंदेश्वर यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार सांगितली.
याप्रकरणी मोबाईल क्रमांक धारक ८४८५०-३७३९४ व ८८८६१-४०१९३ वामिका विनावा, हेमंत कुमार निशाद, आमीद रामदास बीडकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे करीत आहेत.