‘केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक


अज्ञात व्यक्तीने बँक अधिकारी असल्याचे सांगून व्हॉट्सॲपवर APK फाइल पाठवली; क्रेडिट कार्डमधून रक्कम लंपास
चाळीसगाव | प्रतिनिधी : पंजाब नॅशनल बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून एका वकिलाची ९७ हजार ५०८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक अधिकारी असल्याचे सांगून संपर्क
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरा शंकर राठोडे (वय ५१, व्यवसाय वकील, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) यांना अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून संपर्क साधला. आपण पंजाब नॅशनल बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्याने संबंधित व्यक्तीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर संशयिताने फिर्यादीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून एक APK फाइल पाठवली. ही फाइल उघडून आवश्यक प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले.
क्रेडिट कार्डमधून ९७ हजारांची रक्कम लंपास
फिर्यादीने संशयिताच्या सांगण्यावरून प्रक्रिया केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधून ९७ हजार ५०८ रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(c), 66(d) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ करीत आहेत.









