एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड अदलाबदल ; २५ हजारांची फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी) – किराणा घेण्यासाठी पैसे काढायला गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला एटीएममध्ये मदतीचा बहाणा करून २५ हजार ७०० रुपयांना गंडवल्याचा प्रकार जळगावात घडला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी एसबीआय मुख्य शाखेच्या एटीएममध्ये घडली असून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चंदूआण्णा नगर येथील रमेश हरचंद मोरे (६६) हे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास किराणा घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये गेले. पहिल्यांदा कार्ड टाकूनही पैसे निघाले नाहीत.
त्याचवेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने मदत करण्याच्या नावाखाली पीन टाकण्यास सांगितले. मोरे यांनी पीन टाकल्यानंतरही पैसे न निघाल्याने त्या अनोळखी इसमाने कार्ड परत दिल्याचे भासवून हातचलाखीने कार्ड अदलाबदल करून तो पसार झाला.
मोरे घराकडे निघाल्यानंतर ख्वाजामिया चौकात पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. मेसेजनुसार त्यांच्या बँक खात्यातून तीन वेळा पैसे काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली. एकूण रक्कम ₹२५,७०० इतकी होती.
मोरे यांनी एटीएममध्ये झालेल्या अदलाबदलीचा संशय घेत त्वरित जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे.









