जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथे केळीच्या बागेत फिरणाऱ्या बिबट्याने हरणाचा फडशा पाडल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून मृत हरणाची विल्हेवाट लावली आहे.
नांद्रा बुद्रुक येथील शेतकरी गणेश रामचंद्र सोनवणे यांच्या शेतात घटना घडली आहे. शेतकरी सोनवणे हे शेतात गेल्यानंतर त्यांना केळीच्या बागेत नीलगाय मृतावस्थेत आढळून आली. प्रथमदर्शनीहरिणीची शिकार केल्याचे स्पष्टपणे दिसत होते. सोनवणे यांनी तातडीने त्याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनपाल संदीप पाटील व वनरक्षक अजय रायसिंग हे पेट्रोलिंगचे वाहन घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांना हरिणीच्या मानेवर बिबट्याच्या दाताच्या खुणा दिसून आल्या.
रात्रीच्या वेळेस बिबट्याने हरणाची शिकार केलेली असावी, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी नीलगायीच्या मृतदेहाची तिथेच विल्हेवाट लावली. नांद्रा परिसरातील शेतात बिबट्याचा अधिवास आहे. अनेक वेळा गावकऱ्यांना बिबट्या दिसलेला सुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी या गावात बिबट्याने हरणाची शिकार केली होती. बिबट्या त्याच्या शिकारीच्या शोधात केळीच्या शेतात फिरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. बिबट्या दिसल्यास वन विभागाच्या कार्यालयाशी मदतीसाठी १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.