तुळशी पान अँड कोल्ड्रिंक्स दुकानावर अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई; प्रतिबंधित गुटखा जप्त
फैजपूर ( प्रतिनिधी ) – फैजपूर-यावल रोडवरील तुळशी पान अँड कोल्ड्रिंक्स या दुकानावर अन्न सुरक्षा विभाग आणि फैजपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला. या प्रकरणी दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बो-हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. ९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.४० वाजता फैजपूर-यावल रोडवरील दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कर्मचंद पान मसाला या प्रतिबंधित गुटख्याची १९ पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ३ हजार ४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दुकान चालक तुळशीदास दिगंबर चौधरी (वय ३६, रा. आराधना कॉलनी, फैजपूर, ता. यावल) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मानवी आरोग्यास अपायकारक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गावभणे करीत आहेत.









