मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई बॉमस्फोटाच्या खटल्यातील दोषींकडून जागा स्वस्तात खरेदी केल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला नवाब मलिक देखील उत्तर देणार आहेत. त्यांनी ट्वीट करत “आ रहा हूँ मैं”, असा इशारा दिला आहे.

मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वानखेडे कुटुंबानंतर नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांवर देखील ड्रग्ज संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जच्या व्यवसायत सहभाग असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. दरम्यान, नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सुरु असलेल्या शाब्दीक युद्धानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.







