पणजी ( वृत्तसंस्था ) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ‘ईडी’च्या माध्यमातून ‘क्रिमिनल सिंडिकेट’ चालवलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत संजय राऊत ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळत असल्याची टीका केली आहे.
‘ईडी’ काय कारवाई करते, हे ‘ईडी’ सांगेल. ते का कारवाई करताहेत हे देखील ‘ईडी’ सांगेल. संजय राऊत सध्या ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. राऊतांचे हे सर्व वक्तव्य आहेत, तो ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळण्याचाच प्रकार आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांना ‘ईडी’ बद्दल ज्या काही तक्रारी आहे, त्यांनी त्या कोर्टात मांडाव्यात. संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन सर्वांचे मनोरंजन करतात. यापेक्षा त्यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देता येणार नाही, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे. सिंह कधी गिधाडाच्या धमक्यांना भीत नाही. त्यांना ज्या काही समस्या आहेत, त्यांनी त्या कोर्टात मांडव्यात, असं म्हणत फडणवीस यांनी राऊतांच्या आरोपांवर टोला लगावला आहे.
‘ईडी’च्या माध्यमातून ‘क्रिमिनल सिंडिकेट’ चालवण्यात येत आहे. ईडी आणि इतर तपास यंत्रणा भाजपच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनल्या आहेत. उपराष्ट्रपतींना लिहिलं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. ट्रेलरही अजून यायचा आहे. ईडीची माणसं कशा प्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे आर्थिक घोटाळे कसे आहेत आणि हेच कसे मनी लाँड्रींग करताहेत आणि ब्लॅकमेल, धमक्या देऊन पैसा गोळा करतात, यांचे वसुली एजंट आहेत, असे आरोप संजय राऊत यांनी केले.