बंगरुळु ( वृत्तसंस्था ) – दिल्लीमध्ये २०१८ साली एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली होती. तशीच घटना बंगळुरमध्ये घडली असून एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला असून एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपशील घेतला पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती (५४), सिंचना (३४), सिंधुराणी (३१) आणि मधूसागर (२५) अशी मृतांची नावं आहेत. या सगळ्यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचसोबत एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर आढळून आला. एक अडीच वर्षांची मुलगी मात्र वाचली आहे. या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.