मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सतीशचंद्र गोरे यांनी केले मार्गदर्शन
जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित कार्यशाळेत दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत केले. या कार्यशाळेत प्रख्यात मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सतीशचंद्र गोरे यांनी दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेविषयीची सखोल माहिती दिली.
जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक असोसिएशन, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिरोग विभाग व शरीररचना शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन स्पाईन अंतर्गत गुरूवारी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात कॅडेवेरीक एन्डोस्कोपीक स्पाईन सर्जरी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.सतीशचंद्र गोरे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. रवींद्रनाथ कोम्मी, डॉ. ओंकार सुदामे, वैद्यकिय महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डीन डॉ. एन.एस. आर्विकर, जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भूषण झंवर, सायन्टीफिक चेअरमन डॉ. विनोद जैन, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, प्रा.डॉ. अमृत महाजन, डॉ. हर्षवर्धन जावळे, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. दीपक अग्रवाल हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरूवातीला मान्यवरांचा सत्कार माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. दीपक अग्रवाल यांचा वाढदिवसानिमीत्त डॉ. सतीशचंद्र गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, मणका शस्त्रक्रिया कार्यशाळा ही प्रथमच होत असून उत्तर महाराष्ट्रात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ती आयोजीत करण्यात आली ही गौरवास्पद बाब आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा पुढील काळातही ह्याच परिसरात घेण्यात याव्या अशी अपेक्षाही डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकानंतर मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. ओंकार सुदामे यांनी पाठदुखी, पायदुखी, सायटीका यासारख्या आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियेविषयीची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दिली. तसेच प्रख्यात मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सतीशचंद्र गोरे यांनी एमआरआय कसा वाचावा, हिपजॉइंट, मणका शस्त्रक्रियेविषयीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयीची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मणका विकार त्यावरील उपचाराचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मान्यवर तज्ज्ञांकडून जाणून घेतले. या कार्यशाळेला २०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अपूर्वा कुळकर्णी आणि डॉ. विक्रांत गायकवाड यांनी मानले.