शिरसोलीतील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईदरम्यान धक्कादायक प्रकार
जळगाव(प्रतिनिधी) : – शिरसोली येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर चालक आणि मालकाने हुज्जत घालत घटनास्थळावरून पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल रविवारी घडली. या प्रकरणी डंपर चालक, मालक आणि डंपर पळवून नेणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे

महसूल विभागातील मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे (रा.जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार त्या ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले, महसूल सेवक मयूर मराठे आणि पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्यासह १९ जुलै रोजी सकाळी सुमारे ७.४० वाजता शिरसोली-कुऱ्हाडदा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी कुऱ्हाडदा बाजूकडून येणारा एमएच-१९ सीवाय-४४३९ क्रमांकाचा राखाडी-पांढऱ्या रंगाचा डंपर महसूल पथकाने थांबवून तपासला. डंपरमध्ये अंदाजे चार ब्रास अवैध वाळू आढळून आली. चालकाने आपले नाव मुकेश शिवदास सोडे (रा. वाघनगर, जळगाव) असे सांगितले. वाळू वाहतुकीचा परवाना व पावती मागितल्यावर तो कोणतेही कागदपत्र सादर करू शकला नाही.
त्यानंतर डंपर जप्त करून प्रशासकीय इमारतीत आणण्याच्या उद्देशाने महसूल सेवक मयूर मराठे यांना डंपरमध्ये बसविण्यात आले. त्याचवेळी तेथे आलेल्या सोनू गोसावी याने डंपर व वाळू आपली असल्याचा दावा करत महसूल पथकाशी अरेरावी केली. त्याने चालकाला खाली उतरवून स्वतः डंपर चालवत घटनास्थळावरून पळ काढला. त्या वेळी महसूल सेवक मयूर मराठे हे डंपरमध्येच होते. काही अंतरावर जाऊन त्यांना रस्त्यात उतरवून संशयित आरोपी डंपरसह पसार झाला.
महसूल विभागाच्या ताब्यात असलेला अंदाजे १७ हजार रुपयांची चार ब्रास वाळू भरलेला डंपर पळवून नेल्याप्रकरणी मुकेश शिवदास सोडे (चालक), राजू गोसावी (डंपर मालक) आणि सोनू गोसावी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.









