रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) :- मोटारसायकलने एसटी बसला मागून जोरदार धडक दिल्यामुळे एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना मोरव्हाल (ता. रावेर) येथे घडली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील बोरवाल (ता. झिरण्या, जि. खरगोन) येथील विठ्ठल रामसिंग भिलाला व बबलू आनसिंग भिलाला हे दोघे मोटरसायकलने (क्रमांक एमपी १०, एमसी ०९३०) खरगोनकडून रावेरकडे येत होते. पालकडून रावेरकडे येणाऱ्या बस क्रमांक (एमएच २०, बीएल ०९१०) या बसला मोरव्हाल फाट्याजवळ मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात विठ्ठल भिलाला (वय ५०) हे ठार झाले. तर बबलू आनसिंग भिलाला (वय ३०) हा जखमी झाला.
सुनील भिलाला याने रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले तपास करीत आहेत.