पुणे ( वृत्तसंस्था ) – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाच्या खटल्यात 5 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आला आहे. पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला आहे.
आता 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टानं दोषारोप निश्चित केले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येनंतर तब्बल 8 वर्षानंतर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. 5 आरोपींपैकी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना येरवाड्यात आणलं जाणार आहे. आता या पाचही आरोपींविरोधात खटला चालवला जाणार आहे.
पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोळकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोळकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते.
दाभोळकरांच्या हत्येला 8 वर्षाचा कालावधी लोटला आहे. पाच वर्षानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. नालासोपारा स्फोटकप्रकरणी तपास करीत असताना एटीएसला डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले होते. या घटनेला इतके वर्षे उलटूनही खटला सुरु न झाल्याने पीडित कुटुंबाच्या वतीने काम पाहणाऱ्या वकिलांनी यावर प्रश्न उभे केले होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी हत्या झाली होती. दोन्ही घटनांप्रकरणी मुंबई हायकोर्टात खटला सुरु आहे.
“दाभोलकरांच्या खूनानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचेही खून झाले. या सर्व खूनांचा आणि नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हा एकमेकांशी जोडलेले आहेत. या पाचही प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार समान आहेत. हा एका मोठ्या व्यापक कटाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ काही तरुण आरोपी पकडलं जाणं पुरेसं नाही. त्यांना पैसे पुरवणारं कोण आहे, हा मोठा कट तयार करणारे कोण आहेत एकूणच या संपूर्ण कटाचे सूत्रधार कोण आहेत हे समोर येणं गरजेचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी हा व्यापक कटाचा भाग असल्याचं निरिक्षण नोंदवलंय. म्हणूनच या कटाच्या मुळांशी पोहचणं गरजेचं आहे,” असं मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलं.