मृत जळगाव शहरातील, यावल तालुक्यातील शिरागड येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरागड येथे दर्शनासाठी जळगाव येथील दोन तरुण आले होते. त्यानंतर सप्तश्रृंगी देवी मंदिराजवळील तापी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे यावल तालुक्यासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोहन काशिनाथ श्रीखंडे (वय १७, रा. रामानंद नगर, जळगाव) व प्रथमेश शरद सोनवणे (वय १७, रा. वाघ नगर, जळगाव) असे मयत तरुणांचे नाव आहे. त्यांनी नवीन दुचाकी घेतली होती. हि दुचाकी घेऊन ते यावल तालुक्यातील शिरागड येथे सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी गेले होते. दर्शन आटोपल्यावर त्यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराजवळ तापी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी सुरुवातीला पोहताना फोटोही काढले. मात्र नंतर पोहण्यासाठी आत गेले असता तापी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी यावल पोलीस स्टेशनला माहीती दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी यावल ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही मुलांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहेत. दरम्यान, मृतांचे नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला आहे.
दरम्यान, मयत रोहन श्रीखंडे हा गरीब घरातला होता. त्याच्या वडिलांना दुर्धर आजार झाला असून आई मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करते. रोहनला दोन भाऊ आहेत. दरम्यान, रोहनच्या जाण्यामुळे श्रीखंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.