डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्यात पद्मश्री डॉ. बावस्कर यांचे प्रतिपादन
जळगाव – आपला मुलगा डॉक्टर झाला म्हणजे पालकांना असे वाटते की आता हे पैसे देणारे झाड झाले आहे. बहुतांश पालकांच्या मन:स्थितीचा मी अभ्यास केला आहे. परंतु एमबीबीएसची पदवी घेतलेले हे डॉक्टर पैसे देणारे नव्हे तर समाजाला सावली देणारे झाड असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. हिंम्मतराव बावस्कर यांनी केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सन २०१९ च्या बॅचचा दिक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. बावस्कर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. पी.एच. बावस्कर, गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. माया आर्विकर, डॉ. सुहास बोरले, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच यावेळी डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी पदवी प्रदान सोहळ्याची घोषणा केली. त्यानंतर डीन डॉ. सोळंके यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती विशद केली. तसेच या समारंभाला पद्मश्री डॉ. हिंम्मतराव बावस्कर यांची उपस्थिती लाभल्याने २०१९ ची बॅच ही अत्यंत भाग्यशाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य सेवेची गरज- डॉ. केतकी पाटील
सन २०१९ ही बॅच मोठ्या कठीण काळातून गेली आहे. कारण शैक्षणिक वर्षात कोरोनाचे संक्रमण आले. याकाळात प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा ताण होता. आता पुढे काय होईल? असा प्रश्न त्यांच्या मनात होता. मात्र पालक आणि विद्यार्थी यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच आज हा समारंभ होत आहे. आज तुम्हाला जरी डिग्री मिळाली असली तरी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मोठ्या शहराकडे न वळता ग्रामीण भागात आरोग्य सेवा बजवावी असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी केले.
ैसैनिकाप्रमाणे डॉक्टरांनीही हृदयात देश बाळगावा – डॉ. बावस्कर
दिक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यामुळे पालकांना आता हे पैसे देणारे झाड झाल्यासारखे वाटू नये. तर आपल्या मुलांनी समाजाची सेवा करीत त्यांना सावली देणारे झाड मानले पाहिजे. ग्रामीण भागात आजही खूप गरीबीची परीस्थिती आहे. त्याठिकाणी आरोग्याच्या सुविधाही तोकड्या स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गरीबी न विसरता ग्रामीण भागातील सेवा द्यावी. एखादा सैनिक ज्याप्रमाणे आपल्या हृदयात देश ठेवतो त्याचप्रमाणे पदवी घेतलेल्या डॉक्टरांनीही हृदयात देश आणि नजरेत रूग्ण ठेवावा असा सल्लाही पद्मश्री डॉ. बावस्कर यांनी दिला. यावेळी डॉ. बावस्कर यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास कथन केला. डॉ.हिम्मतराव साळूब बावस्कर हे मूळचे देहेड तालुका भोकरदन जिल्हा जालना महाराष्ट्र येथील एका शेतकरी कुटुंबातून अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावलेले संशोधक आहेत. त्यांना २०२२ साली पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी ते प्रख्यात आहेत.
१४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या दिक्षांत समारंभात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या १४० विद्यार्थ्यांना पद्मश्री डॉ. हिंम्मतराव बावस्कर यांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. आपला पाल्य डॉक्टर झाल्याने अनेक पालकांच्या डोळे आनंदाश्रुंनी डबडबलेले दिसून आले.