सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) :- शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड निश्चित झाली आहे. महायुतीच्या वतीने त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, आज मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत गणरायाचे दर्शन घेतले.



दीपमाला काळे यांना सायकलिंगची प्रचंड आवड असून त्या आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असतात. महापौर पदाची मोठी जबाबदारी खांद्यावर येण्यापूर्वी त्यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’ असा संदेश देत सायकलने पद्मालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पद्मालय येथील गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेसाठी आपल्याला बळ मिळावे, असे साकडे गणरायाला घातले. यावेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड निश्चित झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
६ तारखेला होणार अधिकृत घोषणा
महापौर पदासाठी महायुतीकडून केवळ दीपमाला काळे यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. या निवड प्रक्रियेची अधिकृत घोषणा येत्या ६ तारखेला होणार असून, जळगावला एक ‘फिट’ आणि कार्यक्षम महापौर मिळणार असल्याची भावना सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.









