नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,73,13,163 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,52,991 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2812 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,95,123 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरणा वेगाने सुरू आहे. याच दरम्यान दिल्ली सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. 1 मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.








