धुळे (प्रतिनिधी)- कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांची दखल घेत, ‘ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शना’त धुळे जिल्ह्यातील खलाणे येथील युवा शेतकरी मनोहर धनराज पाटील (एम. डी. पाटील) यांना राज्यस्तरीय “आदर्श शेतकरी पुरस्कारा”ने सन्मानित करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.

धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांतून धुळे जिल्ह्यातील एकमेव शेतकरी म्हणून मनोहर पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, शेतीतील या यशात त्यांच्या पत्नी निर्मला पाटील यांचाही मोलाचा वाटा असल्याने, या दांपत्याचा जोडीने सत्कार करण्यात आला. यावेळी ॲग्रीसर्च इंडिया लिमिटेडचे एरिया मॅनेजर महेश पाटील, पराग गणू, विभागीय अधिकारी नारायण विसावे आणि निर्मलचे सीईओ विजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी वेळोवेळी मनोहर पाटील यांच्या शेतीची पाहणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
शेतीतील यशस्वी प्रयोग
मनोहर पाटील यांनी आपल्या शेतात पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक फळबागेवर भर दिला आहे. त्यांनी आपल्या शेतात पिकांचे यशस्वी प्रयोग राबवले आहेत. पपई व बोरे, ॲपल बोर व आवळा, पेरू आणि शेवगा. त्यांच्या या विविध प्रयोगांमुळे आणि शेतीतील उल्लेखनीय प्रगतीमुळे त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती.
गावाकडून अभिनंदनाचा वर्षाव
खलाणे सारख्या ग्रामीण भागातील एका युवा शेतकऱ्याने राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल खलाणे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांकडून त्यांचे कौतुक होत आहे. सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीगाठींतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने परिसरातील इतर तरुण शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.









