चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
धरणगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील जैन गल्लीत चोरट्याने बंद घर फोडल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. परंतू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्यामुळे चोरट्यांचा सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला. शहरातील जैन गल्लीत विवेक लाड हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. काही कामनिमित्त दोन दिवसापूर्वी ते मुंबई येथे गेले आहेत.
घर बंद असल्याची संधी साधत पहाटे ४ वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामान अस्तव्यस्त करत दागिने आणि रोकड शोधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, लाड हे बाहेरगावी असल्यामुळे घरातून नेमकी किती रक्कम व ऐवज चोरीस गेला, हे श्री. लाड हे धरणगावात परत आल्यावरच समजू शकणार आहे. दरम्यान, याच अज्ञात चोरट्यांनी जैन गल्लीतील विजय झुंजारराव यांचे सलूनचे दुकान फोडून त्यामार्गे सराफाचे दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास जैन गल्लीतील सुयश डहाळे यांनी चोरट्यांना बघितले. त्यांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय एस. के. पवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जैन गल्लीत पोहचले. पोलिसांना बघताच चोरट्यांनी पळ काढला. पीएसआय पवार यांनी सुभाष मराठे आणि मोहसीन खानआपल्या सहकाऱ्यांसोबत चोरट्यांचा गल्ली बोळातून सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे सोनवद रोडच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झालेत.
दरम्यान, चोरटा फरार होण्यापूर्वी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांना तपासात मदत होणार आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून सराफ व्यावसायिक बांधवांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची सूचना दिलाय आहेत.