धरणगाव ( प्रतिनिधी ) शहरातील आठवडे बाजारासाठी जात असलेल्या दुचाकीला भरदार ट्रकने उडवल्याने ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना पिंपळे व निशाणी फाट्याजवळ गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर छगन कोळी (वय-२८) रा.नांदेड ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे सागर कोळी हा तर आपले आई – वडील व मोठा भाऊ यांच्यासह राहायला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. धरणगाव शहरात आठवडे बाजार दर गुरुवारी भरतो. या निमित्ताने सागर कोळी हा गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता दुचाकी क्रमांक (एमपी ४६ एमके ३१६) यावरून धरणगाव शहरात बाजारात जात होता. त्यावेळी पिंपळे व निशाणी फाट्याच्या जवळील रस्त्यावरून जात असतांना समोरून अज्ञात भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सागर कोळी हा तरुण जागीच ठार झाला, दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रक चालक हा ट्रक घेऊन पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत तरुणाच्या कुटुंबाने एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. या संदर्भात सागर कोळी यांचे काका भागवत यशवंत कोळी यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात ट्रक चालक विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पवार करीत आहे.