चोरटे नगर जिल्ह्यातील : चोरट्यांचे वाहन अडवताना पोलिसांचे वाहन उलटले
चाळीसगाव शहर, भडगाव हद्दीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरात गुरुवारी दि. २५ जुलै रोजी एका डिझेल चोरट्यांच्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग करताना भडगाव पोलिसांचे वाहन उलटले. तर चोरट्यांच्या वाहनाचीही विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. या घटनेत ४ पोलीस कर्मचारी यांचेसह २ नागरिक जखमी झाले आहेत. वाहनातील चोरटे हे अहमदनगर जिल्ह्यातील असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तिघा चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता सिनेस्टाईल या चोरट्याना अटक केली आहे
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार पो.कॉ.आशुतोष सोनवणे, पोलिस शिपाई रविंद्र बच्छे आणि पवन पाटील असे तिघे जण दि. २५ जुलैच्या रात्री शासकीय वाहनाने रात्र गस्त करत होते. दरम्यान त्यांना (एमएच ०४ एफ ए ३०४४) या क्रमांकाची स्विफ्ट डीझायर कार हिरापूर रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत फिरतांना आढळून आली. त्यामुळे रात्रगस्तीवरील इतर अंमलदारांच्या मदतीने पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला. (केसीएन)या स्विफ्ट वाहनावरील वाहनचालकास पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने वाहन भरधाव वेगाने भडगावच्या दिशेने पळवले. संशयास्पद वाहन भडगावच्या दिशेने पळून गेल्याने या बाबतची माहिती भडगाव पोलिसांना कळवण्यात आली.
भडगाव पोलिस स्टेशनच्या रात्रगस्तीवरील कर्मचारी चालक संदिप सोनवणे, पो.ना. मनोहर पाटील, पो.ना.किरण पाटील आदींनी या वाहनाचा अटकाव करण्याचा प्रयत्न केला. भडगाव येथे देखील पोलिस आपल्या मागावर असल्याचे दिसताच संशयित वाहनचालकाने यु टर्न घेत वाहन पुन्हा चाळीसगावच्या दिशेने वळविले. संशयीत वाहन पुन्हा चाळीसगाव शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच त्याचा अटकाव करण्यासाठी कजगाव नाका (भडगाव पो.स्टे.), पातोंडा गाव, खरजई नाका (चाळीसगाव पो.स्टे.) याठिकाणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार शशीकांत महाजन, पो.ना.महेंद्र पाटील, भुषण पाटील, पो.शि. राकेश महाजन, समाधान पाटील, विजय पाटील, पो.कॉ. सतीष पाटील व पोहेकॉ नितेश पाटील, पो.कॉ. विजय महाजन आदींनी नागरिकांच्या मदतीने बॅरीकेट्स लावून नाकाबंदी केली.
मात्र तरीदेखील संशयीत भरधाव वेगातील वाहन चालकाने बॅरिकेट्स तुडवून नाकाबंदीवरील कर्मचा-यांच्या दिशेने त्यांच्या जिवीताची पर्वा न करता वाहन सुरूच ठेवले. घटनास्थळी हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी वेळीच प्रसंगावधान राखत ते बाजुला झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र ते जखमी झाले. चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात भडगाव व चाळीसगाव शहर पोलिसांनी शासकीय वाहनाने पाठलाग केला.(केसीएन) भडगाव पो. स्टे. चे पोलीस अंमलदार संदिप सोनवणे, मनोहर पाटील यांनी जिवाची पर्वा न करता ओव्हरटेक करुन संशयीत स्विफ्ट डीझायर कार चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र स्विफ्ट डिझायर मधील संशयितांनी पोलिस कर्मचा-यांना जीवे ठार मारण्याची चिथावणी दिली.
भडगाव पोलिसांच्या ताब्यातील सरकारी वाहनास मागून धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ते रस्त्यावर उलटून अपघातग्रस्त झाले. यामुळे संशयीत स्विफ्ट डिझायर कार चालकाचे देखील त्याच्या ताब्यातील वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावरील विजेच्या पोलवर जावून आदळले. स्विफ्ट डिझायर कार चालक व त्याच्या दोघा साथीदारांना पळून जाण्याची संधी न देता त्यांच्या मागावरील चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडण्यात यश मिळवले. आकाश बाळासाहेब कुडे (रा. कोराडे ता. राहता जि. अहमदनगर), मनोज अशोक वाघमारे (रा. कालीका नगर, शिर्डी जि. अहमदनगर), आणि रशिद रफिक पठाण (रा. वाकळी ता. राहता जि. अहमदनगर) अशा तिघे संशयित आरोपींचे नाव आहे.
त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यात चोरीचे डीझेल भरण्यासाठी ८ रिकामे ड्रम, डिझेल काढण्यासाठी लागणारे २ पाईप आदी साहित्य आढळून आले. भडगाव पो. स्टे. चे पोलिस नाईक मनोहर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील व भडगांव पोलीस स्टेशनचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व पोहेकॉ राकेश पाटील हे पुढील तपास करत आहेत. (केसीएन) या घटनेत भडगाव पो. स्टे. शासकीय वाहन उलटल्याने अपघातग्रस्त झाले आहे. त्यातील भडगाव पो. स्टे. चे अंमलदार मनोहर पाटील, पो.कॉ. संदिप सोनवणे तसेच चाळीसगाव शहर पो. स्टे. चे अंमलदार आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, नाकाबंदीकामी मदतीस आलेले नागरिक गणेश महाजन व यश पाटील हे नाकाबंदीचे बॅरेकेटस लागल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.