जळगाव तालुक्यात धामणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, प्र. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे व ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे याचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगांव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना वैद्यकीय अधिकारी यांनी सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.
दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येत असतो. डेंगू दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना डेंगू आजाराबाबत शास्त्रीय माहिती मिळून जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. डेंग्यू व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना, घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली. डेंग्यू व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाबरोबर जनतेचा सहभाग असणे देखील गरजेचे आहे. त्याशिवाय या आजारांवर आपण नियंत्रण मिळू शकत नाही. असेही यावेळी डॉ. अभिषेक ठाकूर म्हणाले.
प्रा. आ. केंद्र धामणगांव अंतर्गत उपकेंद्र ममुराबाद, मोहाडी, व सावखेडा बु. येथे ता. हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन ,आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, डी. सी. सपकाळे, आरोग्य सेवक निलेश पाटील, घनश्याम लोखंडे व सतीश अजलसोडे यांनी गावात जाऊन पाण्याचे कंटेनर, डास उत्पत्ती स्थाने याची पाहणी केली. डेंग्यू व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळावा, दैनंदिन पाण्याच्या वापराकरिता घरामधील व घराबाहेरील टाकी आठवड्यातून एक वेळेस पूर्णपणे रिकामी व घासून-पुसून स्वच्छ करून पुन्हा भरून झाकून ठेवावी, इमारतीच्या गच्चीवर व परिसरात टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी सासेल अशा टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. त्यांची विल्हेवाट लावावी. गावालगतच्या नाल्या मधील पाण्यात गप्पी मासे सोडावे इ. बाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी डॉ. अजय सपकाळ, डॉ. अभिषेक ठाकूर, डॉ. प्रणव भदादे, डॉ. राहुल बनसोडे, डॉ. वृषाली पवार, ता. हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, औ.नि.अ. प्रियंका मंडावरे, महेश वाणी, आरोग्य सेवक निलेश पाटील, घनश्याम लोखंडे, सतीश अजलसोडे, आरोग्यसेविका वैशाली सपकाळे, संगीता कोळी, एन जे बागरे, सुनिता पाटील, जयश्री कंखरे, शिवानी वाजपेयी, सुवर्णा न्हावी, आशिष अवस्थी, दीपक कोळी, मयूर पाटील, सुनील कोळी, नोमान अख्तर, संगीता घेर, मनीषा खंबायत, कविता सपकाळे व आशा सेविका आदी उपस्थित होते.