जळगाव- जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. काही गावे तर कोरोनामुक्त झालेली आहेत. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम व KLiC सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी. गेल्या पंधरा महिन्यापासून व्यवसायिक कर्जबाजारी झालेले आहेत. त्यांच्या सेवा व्यवसायास परवानगी द्यावी असे निवेदन जिल्ह्यातील संगणक संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.
निवेदनात जळगाव जिल्ह्यात एमकेसीएल ची 152 अधिकृत केंद्र आहेत. केंद्रातून येणा-या उत्पन्नातून लाईट बिल, इंटरनेट बिल, मनपा कर, शिक्षकांचा पगार अथवा मानधन आदी दैनंदिन खर्च होत असतात ते सर्व थकले आहेत. केंद्रांमध्ये 70 टक्के अधिक प्रवेश उन्हाळ्याच्या मुद्रित म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यात होतात. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर हजारो विद्यार्थी एमएससीआयटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी तसेच निमशासकीय व खाजगी क्षेत्रात कामासाठी लाभदायी आहे.
परंतु प्रदीर्घ काळापासून प्रवेश बंद आहे. अभ्यास केंद्रे किती महिने आणखी बंद राहील हाही एक प्रश्न आहे. केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जास्त काळ बंद राहिल्यास निकामी होण्याचा धोका आहे, असे झाल्यास केंद्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसेल. त्याकरिता ही केंद्रे सुरू करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स व इतर नियम पाळण्याची हमी ही नमूद केलेली आहे निवेदनावर संगणक संचालकांच्या स्वाक्षर्या आहेत.








