जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आव्हाणे येथे दारूच्या नशेत एका तरुणाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.


फिर्यादी प्रदीप घनश्याम पाटील (वय २५, रा. आव्हाणे) हे ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील मारुती मंदिराजवळील चहाच्या टपरीसमोर उभे होते. यावेळी आरोपी नितीन उर्फ पपई जगन पाटील (रा. आव्हाणे) हा दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला. त्याने कोणत्याही कारणाशिवाय प्रदीप यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी नितीनने प्रदीप यांना हातापायांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या हातातील लोखंडी पट्टीने प्रदीप यांच्या डोक्यावर, छातीवर आणि उजव्या हातावर गंभीर इजा केली. “तुला जास्त झाले आहे, आता तुझा कार्यक्रमच लावतो,” अशी जीवे मारण्याची धमकीही आरोपीने यावेळी दिली. या झटापटीत फिर्यादीचा मोबाईल पडून त्याचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी प्रदीप पाटील यांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे १:४० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी नितीन पाटील हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









