भुसावळातील कुंदेश्वर महादेव मंदिरासमोरचा प्रकार; दोन्ही हातांवर वार, मध्यस्थी करणाऱ्या मित्रालाही मारहाण
भुसावळ (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तरुणावर धारदार लोखंडी वस्तूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना भुसावळ शहरातील कुंदेश्वर महादेव मंदिरासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रशांत दिलीप खुपसे (वय २५, रा भुसावळ) यांच्याकडे आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांच्यावर राग धरला.
यानंतर आरोपीने फिर्यादीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार लोखंडी वस्तू काढून फिर्यादीच्या दोन्ही हातांवर वार केल्याने त्यातून रक्तस्राव होऊन ते जखमी झाले.
यावेळी फिर्यादीसोबत असलेले अमोल भागवत राणे यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून त्यांच्या डाव्या खांद्यावर तसेच कमरेवर धारदार वस्तूने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सफौ जयेंद्र पगार करीत असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.








