इन्व्हर्टर-बॅटरी खरेदीच्या नावाखाली दुकानातून माल घेतला
जळगाव (प्रतिनिधी) – इन्व्हर्टर व बॅटरी खरेदीच्या नावाखाली दुकानदाराची ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, फिर्यादी पवन संजय पाटील (वय २८ कुसुंबा, ता. जि. जळगाव) यांचे कुसुंबा येथील रायपूर फाट्याजवळ ‘श्रीनिवास एजन्सी’ नावाचे इन्व्हर्टर-बॅटरीचे दुकान आहे.
१२ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीशी संपर्क साधला. त्याने दुकानातील तीन मायक्रोटेक ९०० इन्व्हर्टर आणि तीन EXIDE IMTT 200AH बॅटऱ्या खरेदी करण्याची मागणी केली.
यानंतर संबंधित व्यक्तीने रिक्षा पाठवून दिली. रिक्षाचालकाकडे वर्णन केलेला धनादेश देण्यात आल्याचे सांगून फिर्यादीने तीन इन्व्हर्टर व तीन बॅटऱ्या रिक्षामधून पाठवून दिल्या. या मालाची एकूण किंमत ७२ हजार रुपये होती.
माल मिळाल्यानंतर फिर्यादी धनादेश वटविण्यासाठी बँकेत गेले असता, संबंधित धनादेशावरील सही जुळत नसल्याचे तसेच बँक खाते बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धनादेश वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ/१३३६ गफ्फार तडवी करीत असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.









