मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी, दुचाकींसह मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथील लालगोटा-धुळे रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या ७ जणांच्या टोळीतील एकाला पकडण्यात यंत्रणेला यश आले असून अन्य सहा संशयीत पसार झाले आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परराज्यातील लोकांना बोलावून त्यांना पिवळ्या रंगाचा धातू देण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धुळे लालगोटा शेतकाकडे जाणार्या कच्च्या रस्त्यावर पुलाजवळ तयारीत असलेल्या आरोपींबाबत माहिती मिळताच पथकाने गुरुवार २७ रोजी धाव घेतली. मात्र संशयीत पसार होण्यात यशस्वी झाले तर एकास पकडण्यात यश आले. राहुल हरी राठोड (वय ३०, रा.जोंधनखेडा) असे पकडण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कॉन्स्टेबल सागर राजू सावे यांच्या फिर्यादीवरून राहुल हरी राठोड, गोपी रायसिंग राठोड, दिनेश भगीरथ राठोड, गजानन भुरा राठोड, रोहित पंढरी साळुंखे (सर्व रा.जोंधनखेडा) व इतर दोन अश्या ७ संशयित आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित आरोपींकडून ३० हजार रुपये किंमतीची नंबर नसलेली ज्युपिटर कंपनीची दुचाकी, ३५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन, २० हजार रुपये किंमतीची नंबर नसलेली दुचाकी, पिवळ्या धातूचा तुकडा व त्यावर फाईन गोल्ड लिहिलेले, लोखंडी चाकू, दोरी व टेप असे साहित्य जप्त करण्यात आले. मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई संतोष चौधरी, प्रदीप इंगळे, हरीश गवळी, सागर सावे आदींच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील तपास करीत आहे.