अमळनेर, (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डांगर शिवारातील एका मोबाईल टॉवरवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बॅटरी, पॉवर केबल आणि ऑप्टिकल केबल असा सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कापडणे यांच्या शेतातील मोबाईल टॉवरवर ही चोरी झाली. चोरट्यांनी टॉवरवरील बॅटरी, पॉवर केबल आणि ऑप्टिकल केबल चोरून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत अमोल शिंदे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काशिनाथ पाटील करीत आहेत.
दरम्यान, अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील मोबाईल टॉवर आणि शेत परिसरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.









